रत्नागिरी - शहरातील थिबा पॅलेस येथील बंद बंगला फोडून चोरट्यांनी किंमती वस्तूंसह सोन्याचे दागिने, असा सुमारे 10 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घरातील कुटुंबीय हज यात्रेला गेल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी ऐवजावर डल्ला मारला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिल लाड हे या गुन्ह्याचा तपास करत आहे.
समीर एजाज गुहागरकर (वय 46 वर्षे) यांनी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी ते पत्नी सादिका, मुलगा मुहिज, सासु शकीला पाटील यांच्या समवेत हज यात्रेसाठी गेले होते. यात्रा करुन ते रविवारी (दि. 15 डिसेंबर) घरी परतले. यावेळी त्यांच्या पत्नी सादिका यांनी चावीने घराचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यावेळी किचनच्या शेजारी बाहेर जाणारा दरवाजा उघडा दिसला म्हणून त्यांनी घरातील सर्व बेडरुमकडे धाव घेतली तेव्हा बेडरुममधील कपाटे उघडलेली दिसली व त्यातील सामान बाहेर अस्ताव्यस्त पडलेले होते.
हेही वाचा - रत्नागिरीत 'आरमार विजयी दिन' साजरा
सर्व कपाटांची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने तसेच इतर साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेचच शहर पोलीस स्थानकात धाव घेत समीर गुहागरकर यांनी तक्रार दिली. चोरीची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक; 'शिवसेनेने निवडणूक लादली'
मागील दोन महिने शहरात चोरीचे सत्र सुरु आहे. त्याच कालवधीत गुहागरकर कुटुंबीय हज यात्रेला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. गुहागरकर यांच्या घरातून चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये घड्याळे, टॅब, सोन्याच्या चैन, कानातील साखळ्या व रिंगा, मंगळसुत्र, हार, बांगड्या, १० हजार रूपये रोख, असा एकूण १० लाख ७९ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
चोरट्यांच्या शोधासाठी शहर, स्थानिक गुन्हे शाखेने पथके तयार केली आहे. त्याभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीसांनी सुरु केले आहे. मात्र, चोरीच्या सत्राममुळे नागरिक भयभित झाले आहेत.