रायगड - 15 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन नैसर्गिक आपत्तीने अनेकांच्या घरात पाणी शिरले. घरे जमीनदोस्त झाली, जनावरे वाहून गेली. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करून आत्तापर्यंत 2 कोटी 93 लाख 65 हजार 184 रुपयांची भरपाई नुकसानग्रस्तांना देण्यात आली आहे. तर, 8 कोटी 05 लाख 46 हजार 146 रुपयांचे अनुदान शिल्लक आहे. तसेच शेतीचे पंचनामे देखील 2 दिवसात पूर्ण होतील असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.
जिल्ह्यात 15 दिवासांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले होते. महाड, पेण, अलिबाग, नागोठणे, रोहा, माणगाव, तळा, कर्जत याभागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुराने काही भागात घराची पडझड झाली, अनेक गुरे वाहून जाऊन मृत्युमुखी पडली. तर, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 30 जणांचा मृत्यू झाला, तसेच शेतीचेही अतोनात नुकसान झाले.
पूरस्थिती निवळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने महसूल व कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाचे पंचनामे सुरू करण्यात आले. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीसाठी 11 कोटी 41 लाख 70 हजाराची आवश्यकता असून 10 कोटी 99 लाख 11 हजार 330 रुपये अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीने मृत, घराची पूर्ण पडझड, अंशतः पडझड, पुराचे पाणी शिरून भांडीकुंडी, कपडे यांचे नुकसान व मृत जनावरे अशी 24550 प्रकरणे असून यापैकी 4591 नुकसानग्रस्तांना 2 कोटी 93 लाख 65 हजार184 रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडून वाटप करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीने बाधित 20841 नुकसानग्रस्तांना अजून अनुदान वाटप करायचे असून त्यासाठी 8 कोटी 5 लाख 46 हजार 146 रुपये अनुदान प्रशासनाकडे शिल्लक आहे. शेतीचे पंचनामे 90 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे ही 2 दिवसात पूर्ण केले जातील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तर, उर्वरित नुकसानग्रस्तांची भरपाई लवकरच त्यांच्या बँकेत जमा केली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.