पनवेल - पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ पालिकेच्या सेवेत कायम घ्यावेत, या मागणीसाठी पनवेल पालिकेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याबाबत पनवेल पालिकेकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे सलग चौथ्या दिवशीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हे धरणे आंदोलन सुरू आहे.
2016 साली पनवेल महापालिका नव्याने स्थापन झाली. त्यावेळी जवळपास 29 गावांतील 23 ग्रामपंचातींचा समावेश महानगरपालिकेत करण्यात आला. पालिकेत समावेश करताना तत्कालीन ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या 384 कर्मचाऱ्यांना पालिकेत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पनवेल महापालिका स्थापन होऊन 30 वर्षे उलटून गेली तरीही हा प्रश्न प्रलंबित असल्याने अखेर म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या 384 कर्मचाऱ्यांनी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाशेजारीच धरणे आंदोलन पुकारले आहे. जुलै, 2019 मध्ये तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायम करण्याबाबत नगरविकास विभागाला निर्देश दिले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे कर्मचाऱ्यांचे समावेशन रखडल्याचा आरोप यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - जागतिक मराठी अकादमी संमेलन: पाहा चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम
आजच्या महागाईच्या काळात गेली 3 वर्षे हे कामगार अतिशय तुटपुंज्या पगारावर हलाकीचे जीवन जगत आहेत. काही कामगारांना तर दरमहा केवळ 1 हजार इतकाच पगार आहे. जवळपास 20 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. 3 कर्मचारी विविध प्रकारच्या अपघातात मृत्यू पावले. केवळ या कामगारांचे महापालिकेमध्ये समावेशन न झाल्यामुळे कायम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाइतका न्याय त्यांच्या कुटुंबियांना देता आला नाही.
अखेर या कामगारांच्या संयमाचा बांध तुटला आणि पनवेल महापालिका आवारातच या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. आजच्या चौथ्या दिवशी शेकापचे नगरसेवक रविंद्र भगत पाठिंबा देण्यासाठी आले होते. हे आंदोलन 12 दिवस सुरू ठेवण्यात येणार असून 12 दिवसांत निर्णय घेतला न गेल्यास कर्मचाऱ्यांच्या वतीने 13 व्या दिवशी मंत्रालयावर मोर्चा नेला जाणार असल्याचा इशारा या आंदोलक कामगारांनी दिला आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद दिल्याने शिवसेनेत नाराजी