रायगड : रेड झोनसह इतर दोन झोनमध्ये मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याची घोषणा रविवारी 3 मार्च रोजी झाल्यानंतर तळीराम आनंदून गेले होते. कधी एकदा रात्र संपून मद्याचे दुकान गाठतो अशी चलबिचलता मद्यपीची झाली होती आणि पहाट होताच तळीरामांची पाऊले झपाझप सकाळीच मद्याच्या दुकानाकडे वळली. सोमवारी भागवत एकादशी असतानाही तळीरामांनी मद्य दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी सोशल डिस्टनसिगची गळचेपीही झाली होती तर काही ठिकाणी सोशल डिस्टनसिग ठेवून दुकान उघडण्याची वाट मद्यपी पाहू लागले. काट्यावर काटा चढू लागला दुकान उघडण्याची वेळ आली मात्र दुकान उघडलेच नाही.
आज दुकाने उघडणार नाही हे कळल्यावर मद्यपी हिरमसून घसा कोरडा ठेवूनच पुन्हा माघारी फिरले. दुपारनंतर जिल्हा प्रशासनाने मद्य आणि बियर विक्री दुकाने सुरू करण्याचा अध्यदेश काढल्याने तळीरामाच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आहे.
लॉकडाऊन सुरू होऊन दीड महिना झाला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या पनवेल महानगरपालिका वगळता कमी झाल्याने ऑरेंज झोनमध्ये आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात शिथिलता लागू झाली आहे. यामध्ये मद्य आणि बियर शॉपी दुकानेही उघडली जाणार असल्याची घोषणा झाल्याने तळीरामाचा आनंद गगनात मावेनासा झाला. संचारबंदी काळात अवाच्या सव्वा पैसे देऊन तळीराम अनधिकृत मद्य विकत घेऊन पीत होते. मात्र आता दुकाने उघडली जाण्याच्या घोषणेने मद्यपी आनंदले आहेत.
4 एप्रिल रोज मद्याची दुकाने उघडणार म्हणून सकाळीच जिल्ह्यातील मद्याच्या दुकानाबाहेर तळीराम गर्दी करून उभे होते. अनेकांनी यासाठी काही योजनाही आखल्या होत्या. सकाळी दहा वाजता दुकाने उघडणार म्हणून त्याआधीच आपला नंबर लवकर लागेल या हेतूने मद्यपी जमा झाले होते. मात्र दहावर काटा आला तरी दुकान उघडली नाही. त्यामुळे चुळबुळ सुरू झाली. आता उघडेल या आशेने मद्यपी थांबून राहिले मात्र दुकाने उघडलीच नाही आणि सर्वांना हिरमुसल्या चेहऱ्याने घसा कोरडा ठेवूनच हात हलवत घरी परतावे लागले.
दुपारनंतर निघाला अध्यादेशसकाळीच मद्य दुकाने उघडणार असे सर्वांना वाटले होते मात्र दुळाने उघडलीच नसल्याने तळीरामाचे घसे हे कोरडेच राहिले. आता कधी उघडणार या आशेवर मद्यपी घरी निघून गेले. दुपारनंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा मद्य आणि बियर शॉपी उघडे करणार असल्याचा अध्यादेश निघाला. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात मद्य विक्री सुरू करण्याचे आदेश दिले असल्याने रायगड जिल्ह्यातही मद्य आणि बियर शॉपी उघडले जाणार आहेत. मात्र यासाठी प्रत्येक व्यक्तींमध्ये सहा फूट अंतर ठेवून एकावेळी पाच व्यक्ती दुकानासमोर अंतराने रांगेत राहून नियम पळून खरेदी करायची आहे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी अध्यदेशात दिले आहेत. त्यामुळे उद्या 5 मेपासून तळीरामाचा घसा ओला होण्यास सुरुवात होणार आहे. मात्र सोशल डिस्टनसिग नियम पालन न झाल्यास दुकाने बंद केली जाणार असल्याचे म्हटले आहे.