पनवेल - मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पनवेल शहराला झोडपून काढले आहे. येथील अनेक सखल भागात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नवीन पनवेलमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.
सुकापूरजवळील गाढी नदीचे पंप कुचकामी असल्यामुळे नवीन पनवेलमधील अभ्युदय बँकसमोरील रस्ता, बांठिया शाळा ते कालिमाता मंदिर रस्ता पाण्याने पूर्णपणे ठप्प झाला आहे. पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे परिसरामध्ये पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सिडकोने नालेसफाई व्यवस्थित न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे. तर याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. न्यू इंग्लिश स्कूल चार रस्त्यावर २ फूट पाणी जमा झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठी कसरत करावी लागली. आपल्या पाल्यांना सोडत असताना पालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. शाळेच्या समोरच्या उद्यानाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
नेहमीप्रमाणे सेक्टर ४, १४ आणि १५ येथे रस्ते पाण्यात गेले होते. खांदा वसाहतीत सेक्टर १३ येथे वेगाने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शिवाजी चौकात काही प्रमाणात पाणी साचले. नवीन पनवेल वसाहतीत अभ्युदय बँक, समाज मंदिर, पोस्ट ऑफिस, शिवा संकुल येथे काही प्रमाणात पाणी साचले. मुंबई-पुणे महामार्गावर ओरियन मॉल येथे ३ फूट पाणी साचल्याने वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. दुपारी ३ वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा झाला. नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.