रायगड - लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी आचारसंहितेचा भंग केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. याच अनुषंगाने रायगड लोकसभा मतदारसंघात विना परवानगी सोशल मीडियावर जाहिरात पोस्ट करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे, शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे. तर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांना पेड न्यूजसंदर्भात खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवली आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना व काँग्रेस या दोन मुख्य पक्षात लढत होत आहे. त्यामुळे दोन्हीही प्रतिस्पर्धी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी सभा, प्रचारफेरी, सोशल मीडियावर जाहिरात, पेड न्यूज याचा आधार घेतला जात आहे. मात्र जाहिरात, सभा, दौरे याचे नियोजन करताना 'माध्यम सर्टिफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी' यांची परवानगी घेऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी पक्षाने घेणे गरजेचे आहे.
मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा ही बातमी व पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यांना सुरुवात, ही एकसारखी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. या दोन्ही बातम्या पेड न्यूजमध्ये मोडत आहेत. याबाबत या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करू नये, असा खुलासा उमेदवारास विचारून कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा. याबाबत पार्थ पवार यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
खेडचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गौसभाई खतीब यांनी फेसबुकवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन मुस्लीम समाजातील बंधू भगिनींना केले आहे. विशिष्ट समाजाला, जातीला उद्देशून आवाहन करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी फेसबुकवर पक्षाच्या लोगोसह कार्यकुशल नेतृत्व हेच रायगडचे भविष्य ही जाहिरात पोस्ट केली आहे. या दोन्ही प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे.
शिवसेना रायगड यांनी फेसबुकवर उमेदवार अनंत गीते यांच्या पक्षाच्या लोगोसह कार्यकर्ता मेळावा व निष्कलंक खासदार अशी जाहिरात पोस्ट केली आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून शिवसेना उमेदवार अनंत गीते यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची जाहिरात सोशल तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियावर करताना माध्यम सर्टिफिकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटीची परवानगी घेणे गरजेचे आहे.