रायगड : अलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाच्या जनजागृतीसाठी गेलेल्या तहसीलदार, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना हुसकावून लावण्याची घटना 22 जुलैला घडली होती. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार 30 ते 35 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. बोडणीकरांनी केलेल्या या कृत्याबद्दल प्रशासनाची जाहीर माफी मागितली असून, कोरोना प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. तर, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक धर्मराज सोनके यांची भूमिका या प्रकरणात महत्वाची ठरत आहे.
बोडणी गाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली होती. बोडणी गावात तहसीलदार सचिन शेजाळ, पोलीस सहाय्यक निरीक्षक धर्मराज सोनके आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी हे 22 जुलैरोजी बोडणी गावात आरोग्य तपासणी आणि जनजागृतीबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यास गेले होते. मात्र, बोडणीकरांनी प्रशासनाला सहकार्य न करता अक्षरश: हाकलून लावले, त्यामुळे वातावरण चिखळले होते. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मांडवा पोलीस ठाण्यात 30 ते 35 जणांवर गुन्हाही दाखल झाला.
दरम्यान, मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी आज दुपारी गावात जाऊन लाँग मार्च काढला. त्यानंतर गावातील प्रमुख ग्रामस्थांची बैठक आयोजित केली. या बैठकीत सोनके यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करून तुमच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी प्रशासन आपल्या गावात आले असता झालेला प्रकार हा चुकीचा असल्याची समज दिली. यानंतर, बोडणी येथील ग्रामस्थ नाखवा मंडळातर्फे पोलीस सहाय्यक निरीक्षक यांना प्रशासनाची जाहीर माफी मागत असल्याचे पत्र बैठकीत वाचून दाखविले. प्रशासनाला आम्ही सहकार्य करू असेही सांगितले आहे. त्यामुळे अखेर प्रशासन आणि बोडणीकर यांच्या वादावर पडदा पडला आहे. तर, धर्मराज सोनके यांनी पुढाकार घेऊन गावातील वातावरण शांत केले. त्यामुळे धर्मराज सोनके हे सिंघम ठरले आहेत.