रायगड - कोरोनामुळे पतीचे निधन झाले. स्वत: पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घर चालवण्यासाठी आवश्यक असलेले शेत कोण कसणार असा प्रश्न अलिबागमधील एका कुटुंबासमोर होता. शेतीवर वर्षभराचा उदर्निर्वाह चालत असल्याने ऐन भातलावणीच्या वेळी क्वारन्टाइन होणं हे कुटुंबाला परवडणारं नव्हतं. मात्र बेलोशीच्या ग्रामस्थांनी या कुटुंबाला धीर दिला. सामाजिक भान राखत त्यांनी भातलावणी पूर्ण करून दिली आहे. त्यामुळे बेलोशीच्या ग्रामस्थांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

या कुटुंबावर आलेल्या संकटात बेलोशी ग्रामस्थ पाठीशी उभे राहिले. त्यांची दोन एकर भातशेतीत बेलोशी ग्रामस्थांनी लावणी पूर्ण केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांकडे शेजारील व्यक्ती, नातेवाईक हे दुजाभाव करत असतात. मात्र बेलोशी ग्रामस्थांनी संकट काळातही एक आदर्श निर्माण केला आहे.

महमारीच्या काळात एकीकडे थेट संपर्क आणि सहवास टाळण्याची मानवी प्रवृत्ती होत आहे. कोरोनातून बरे झाल्यांनतरही या व्यक्तींकडे संशयाने पाहिले जाते. मात्र बेलोशी ग्रामस्थांनी एक पाऊल पुढे जाऊन या कुटुंबाला कोरोना काळात आधार दिलाय. त्यामुळे बेलोशी ग्रामस्थांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
