रायगड - जिल्ह्यासह कोकणात पाऊस पडणार असल्याचा इशारा आज दिला होता. त्यानुसार महाड, पोलादपूर, सुधागड तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. महाड मध्ये काही भागात गाराही पडल्या. महाड तालुक्यातील किंजळोली येथे गवताच्या पेंढ्यावर वीज पडून दोन हजार गवत पेढ्याना आग लागली. सायंकाळ नंतर जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला आहे. मात्र, सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने तूर, मुग, पावटा, हरभरा ही कडधान्ये पिक काढणीच्या टप्प्यात असताना पावसाने लावलेल्या हजेरीमुळे बळीराजा चिंतेत आला आहे.
महाड सह अन्य भागात गारांचा पडला पाऊस -
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सायंकाळी पावसाने जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, सुधागड तालुक्यात हजेरी लावली. पावसासोबत गाराही काही भागात पडल्या. अचानक आलेल्या अवेळी पावसाने नागरिकांची मात्र धावाधाव झाली. पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले.
महाड किंजळोली येथे पडली वीज -
महाड तालुक्यातील दत्ताराम शंकर जगताप किंजळोली बु मुळगाव याच्या शेतात पेंढ्याचे भारे रचून ठेवले होते. सायंकाळी सुरू झालेल्या पाऊस आणि विजेच्या कडकडाटाने जगताप याच्या शेतातील पेंढ्याच्या भाऱ्यावर वीज कोसळली. यामुळे दोन हजार पेढ्याची राख रांगोळी झाली.
रात्री अलिबागसह अन्य भागात वादळी वारे आणि पावसाची सुरुवात -
अलिबाग सह पेण, पनवेल भागात रात्री वादळी वारा सुरू झाला असून विजांचा कडकडाट सुरू झाला आहे. काही भागात पावसाच्या तुरळक सारी पडण्यास सुरुवात झाली आहे. वादळी वारे आणि वीजा चमकत असल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.
अवेळी पावसाने कडधान्य पिकाचे नुकसान -
अवेळी आलेल्या पावसाने तूर, मुग, पावटा, हरभरा हि कडधान्य पिक काढणीच्या टप्प्यात असताना पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाताशी आलेले पीक पावसामुळे वाया जाणार आहे. वीटभट्टी व्यवसायिकांनाही या अवेळी पावसाचा फटका बसला आहे.