रायगड - अलिबाग तालुक्यातील लोणारे येथील अडीच वर्षाची चिमुरडी शर्विका म्हात्रे हिने कर्जत माथेरान मधील किल्ले प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताक दिनी सर केला. हा सुळका तिने अर्ध्या तासात चढून सर केला. शर्विकाची चढण्याची जिद्द पाहून इतर पर्यटकांनीही सुळका चढण्याची स्फूर्ती मिळाली. यापूर्वी शर्विका हिने ११ किल्ले सर केले आहेत. आई वडिलांच्या संगतीने शर्विकाने हा सुळका सर केला.
कर्जत माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला असून तो चढण्यासाठी साधारण तीन तासाचा अवधी लागतो. तेथून कलावंतीण सुळका चढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. कलावंतीण सुळका हा चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. अजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि आभाळाला भिडणारा सुळका तितकीच खाली खोल दरी अश्या नैसर्गिक रचनेमुळे हा सुळका सर करताना भल्याभल्यांची भंबेरी उडते.मात्र, शार्विकाने या सुळक्यावर आरोहण करून गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला. गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावले. शर्विकाच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.