पेण (रायगड) - तालुक्यातील रोडे पंचक्रोशीतील गावांमध्ये मागील काही महिन्यापासून पिण्याचे पाणी गढूळ येत असल्यामुळे रोडे गावातील महिलांसह असंख्य ग्रामस्थांनी आज पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा काढला. घरी येत असलेले गढूळ पाणी बाटलीत आणून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा प्रमुख नरेश सोनावणे यांनी यावेळी सांगितले की, 'मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून अनेकदा ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा कार्यालयाकडे गढूळ येणाऱ्या पाण्याच्या बाबतीत तक्रारी केल्या आहेत. मात्र येथील अधिकारी हे नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असून याबाबत कोणतीच दखल घेत नाहीत. त्यामुळे आज नाईलाजाने महिलांसह ग्रामस्थांनी सदर कार्यालयावर धडक दिली आहे.'
शहापाडा धरणातून येणाऱ्या पाण्याचे शुध्दीकरण होत नाही. यामुळे गढूळ पाणी येत आहे. कित्येक दिवस हेच पाणी पंचक्रोशीतील नागरिक पीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. तर या गढूळ पाण्यामुळे लहान मुलांना त्रास जाणवायला लागला आहे. आम्ही आपली पाणीपट्टी वेळच्यावेळी भरत असताना देखील गढूळ पाणी प्यावे लागते, त्यामुळे आमचा अधिक अंत न पाहता आम्हाला शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी संतप्त महिला वर्गांनी केली.
यावेळी रोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता सोनावणे, उपसरपंच चिंतामण पाटील, सदस्या सोनल सोनावणे, स्मिता म्हात्रे, भारती पाटील, सुरेखा लांगी, सरिता पाटील, शारदा मोरे, पोर्णिमा मोरे आदीसह असंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
सिडकोकडून दरवर्षी जास्त प्रमाणात होणारा पाणीपुरवठा 1 सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. असंख्य गावांना शहापाडा धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्यावर लोड वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी अधिक पाणीपुरवठा करण्यासाठी कॅनलचे पाणी उचलले आहे. ते जास्त गढूळ असल्याने जलशुद्धीकरणातसुद्धा ते पाणी 100 टक्के शुद्ध होत नाही. त्यामुळे गढूळ पाणी येत आहे. मात्र याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तसेच सिडकोकडे पत्र व्यवहार केला असून लवकरच याबाबत मार्ग निघेल, असे पेण ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता येजरे यांनी सांगितलं.