रायगड - दारू पिऊन वाहन चालवू नये, हा नियम असतानाही काही जण नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाशी खेळत असतात. अशीच घटना रेवदंडा-चणेरा रस्त्यावर घडली आहे. मद्यपी चालकामुळे ढेबे कुटुंब उद्धवस्त झाले. चालकाच्या चुकीमुळे दोन लहान मुली पोरक्या झाल्या आहेत.
ढेबेचा सुखी संसार आला वाऱ्यावर
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात टिटवी या गावातील लक्ष्मण ढेबे रहिवासी होते. घरची हलाकीची परिस्थिती असूनही लक्ष्मण ढेबे यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि वस्ती शाळा शिक्षक म्हणून 2004 साली आपल्याच गावातील टिटवी शाळेवर रुजू झाले. तुटपुंज्या पगारावर सुरू झालेली नोकरी करीत त्यांनी आपला संसारही फुलविला. लक्ष्मण हे पत्नी, एक मुलगा, दोन मुलीसह राहत होते. मात्र बुधवारी काळाने त्यांच्या या सुखी संसारावर मद्यपी चालकाच्या रूपाने घाला घातला.
आई, बाबा, भाऊ घरी आलेच नाही
बुधवारी सायंकाळी लक्ष्मण हे पत्नी, मुलासह आपल्या मोटार सायकलवरून घरी निघाले होते. मात्र त्यांचा काळ हा पाठलाग करीत असल्याचे त्यांना माहीत नव्हते. घरी लक्ष्मण यांच्या सात आणि चार वर्षांच्या दोन मुली आई, वडील आणि भावाची वाट पाहत होते. मात्र घरातून गेलेले आई, वडील, भाऊ हे पुन्हा घरी येणार नाहीत, अशी सुतराम कल्पनाही या चिमुकल्यांना नव्हती. रेवदंडा-चणेरा रस्त्यावरून ढेबे कुटूंब आपल्या मोटार सायकलवरून जात असताना रेवदंडाकडून येणाऱ्या ट्रकने लक्ष्मण यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात लक्ष्मण ढेबे आणि मुलगा जागीच ठार झाला. तर पत्नीच्या पायावरून ट्रक गेल्याने पाय निकामी झाले. त्यांना त्वरित रोहा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचाही मृत्यू झाला.
ट्रकचालकाचा दारूचा घोट, ढेबे बहिणीचे आयुष्य उध्वस्त करून गेला
संसाराची गाडी रुळावर येत असतानाच ढेबे कुटूंब मद्यपी चालकामुळे उध्वस्त झाले आहे. आई, वडील, भाऊ याचा अपघातात मृत्यू झाला असून दोन चिमुकल्या घरी या तिघांची वाट पाहत आहेत. मद्यपी चालकांवर कारवाई होऊन त्याला शिक्षाही होईल. मात्र आई, वडिलांचे छत्र हरवलेल्या या निष्पाप मुलीचे न भरून येणारे नुकसान कसे भरले जाणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. ट्रकचालकाचा दारूचा घोट ढेबे बहिणीचे आयुष्य उध्वस्त करणारा ठरला आहे.
हेही वाचा - मद्यपी ट्रक चालकाने 8 जणांना उडवले, चार जणांचा मृत्यू
हेही वाचा - रायगड; नवरा-नवरीची वेशभूषा साकारत चिमुकल्यांनी दिला कोरोना नियम पाळण्याचा संदेश