रायगड ( पेण ) : 75 वर्ष होऊनही पेण तालुक्यातील आदिवासी बांधवांना मतदानाचा हक्क मिळत नाही. हि शरमेची बाब आहे. आम्ही जनावर नाहीत, माणसे आहोत असे आदिवासी भगिनीची व्यथा मांडल्या. ही लढाई जिंकण्यासाठी रस्त्यावर उतरून शासनाल जागे करावे लागेल. संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वेळप्रसंगी बलिदान करावे लागले तरी त्यासाठी तयारी ठेवा. असे आवाहन जी.जी.पारीख यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना केले.
विविध प्रकारे दिल्या घोषणा : "सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करता है", "आदिवासी एकात्मता प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निषेध असो", "या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय", "ये तो अभी झाकी है, पूरी लढाई बाकी है, "कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही", "मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे, आम्हाला मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे" अश्या अनेक घोषणांनी प्रशासनाचा निषेध करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांची पेण पंचायत समितीवर धडक दिली.
मतदानापासून ठेवले वंचित : एका बाजूला भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना याच देशातील आदिवासी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजपर्यंत रस्ता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा तर सोडाच पण मतदानासारख्या संविधानिक अधिकारापासूनही वंचित आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधील उंबरमाळ, तांबडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, खाऊसावाडी या पाच आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी आजपर्यंत एकदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केले नसल्याची बाब समोर आली असून आदिवासी या भारताचे नागरिक नाहीत का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी उपस्थित केला.
शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन : यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, डॉ.जी.जी.पारीख, शोमेर पेणकर, अरुण शिवकर, महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष ऍड.सिद्धार्थ इंगळे, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्राध्यापक आर.बी.पाटील, सचिन गावंड, शैलेश कोंडस्कर, राजेश रसाळ, बोरगाव सरपंच सुधीर पाटील, राजन झेमसे, वैशाली पाटील, सुनील वाघमारे, नीलम वाघ यांच्यासह पाचही वाड्यांतील हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी मोर्चेकऱ्यांना सामोरे जाताना गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी, शासनाच्या अटी-शर्ती पाहून, ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा, विचारविनिमय करून प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविला जाईल.' असे आश्वासन दिले.