रायगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील 226 कातकरी, आदिवासी बांधव हे कामानिमित्त गेलेल्या मध्यप्रदेश, कर्नाटक, सोलापूर या ठिकाणी अडकले होते. या सर्वांना जिल्हा प्रशासनाने खासगी बसने सुखरूप घरी आणले आहे. अडकलेल्या या सर्वांनी आपल्या गावी प्रशासनाने आणल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहे.
लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेले रायगडमधील आदिवासी बांधव सुखरूप परतले घरी जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कातकरी, आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासह कोळसा भट्टयांवर काम करण्यासाठी चार ते पाच महिने स्थलांतरित होतात. राज्यातील बीड, सोलापूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा या राज्यात त्यांना कंत्राटदार कामासाठी घेऊन जातात. साधारणत: होळीपासून मे महिन्यापर्यंत ते जिल्ह्यात परतू लागतात. मात्र या वर्षी लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले. त्यांना सुखरुप परत आणणे, हे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान होते.
लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेले रायगडमधील आदिवासी बांधव सुखरूप परतले घरी कामानिमित्त घेऊन गेलेल्या या आदिवासी बांधवांना घेऊन गेल्यानंतर लॉकडाऊन काळात काही ठिकाणाहून मालक, ठेकेदार पळून गेल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. रायगड जिल्हा प्रशासनाने आधी या सर्वांची माहिती घेऊन तेथील जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या मदतीने पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना मदत पोहोचविली होती. रायगड जिल्ह्यातील एकूण ३० ठिकाणी हे आदिवासी बांधव अडकले होते. त्यात कर्नाटक शासनाने ट्रेन सोडणार नाही, असा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना परत कसे आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला होता.जिल्ह्यातील अडकलेल्या या आदिवासी बांधवांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरुच होते. याबाबत आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाने बाहेरच्या राज्यात अडकलेल्या आदिवासी बांधवांना आपल्या राज्यात व त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात परत आणण्यासाठी एक योजना तयार केली. त्यानुसार रायगड जिल्ह्याच्या आदिवासी प्रकल्प अधिकारी अहिरराव व रोहा प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने यांनी जवळपास 2 हजार 100 आदिवासी मजुरांची माहिती तयार केली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदिवासी विकास सचिव मनीषा वर्मा यांच्याबरोबर चर्चा केली. प्रशासनाच्या सुनियोजनाने आंध्रप्रदेशमधून 72, कर्नाटकमधून 91 तर सोलापूरमधून 60 असे जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एकूण 223 बांधव कुटुंबासहित सुखरूप परत आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. त्यांच्या जेवणाची व संपूर्ण मोफत प्रवासाची सोय आदिवासी विभागाने केली. आदिवासी बांधवानी याबाबत शासन आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.