रायगड - कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे वर्तविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाने पावले उचलली आहे. मात्र ही लाट कधी येणार याबाबत अस्पष्टता आहे. यात मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असली तरी मुलांना धोका नाही. कारण लहान मुलांमध्ये मुळातच आजाराला लढण्याची ताकद असते. तसेच लहानपणी देण्यात आलेल्या लसीमुळे त्याच्यात आजाराशी दोन हात करण्याची ताकद असते, अशी प्रतिक्रिया अलिबागचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना लागण झाली आहे. आता येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या लाटेत मुलांना कोरोनाची लागण होणार यात शंका नसली तरी ती कधी येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र या लाटेत लहान मुले ही आपल्या आतील प्रतिकार शक्तीमुळे आजाराशी दोन हात करू शकतात. लहान मुलांना विविध आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करत असते. या लसीकरणामधून कोरोनाला अटकाव होत नसला तरी त्यावर मात करणारी प्रतिकारशक्ती लसीमधून त्यांना मिळत असते. त्यामुळे लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी काळजी करण्याची गरज नाही आहे, असे डॉ. राजीव धामणकर यांनी म्हटले आहे.
'तपासणी केल्यास मिळतो धीर'
बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर यांनी कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या बालकांना आणि त्याच्या नातेवाईकांवर उपचार केले आहे. रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्याला कितपत आजार जडला आहे, त्यानुसार औषधोपचा सुरू केला जातो. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने सर्व बालरोग तज्ज्ञ सज्ज झाले असून त्यादृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचे डॉ. धामणकर यांनी सांगितले आहे.
'पालकांनी मुलांची योग्य काळजी घेणे गरजेचे'
पालकांनी घाबरून जाऊ नये. मुलाला ताप आल्यास त्याची नोंद करून ठेवणे, घरचे अन्न देणे, बाहेरचे अन्न देणे टाळावे, भरपूर विश्रांती मुलांना द्यावी. मात्र अंथरुणावर जखडून ठेऊ नये, व्यायाम करून घेणे ह्या गोष्टी पालकांनी कराव्यात. पालकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. धामणकर यांनी दिली आहे.
हेही वाचा-गडकरींच्या वाढदिवसाचे औचित्य; वर्ध्यात ब्लॅक फंगसवर प्रभावी एम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनची निर्मिती सुरू