रायगड - पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. सुरवातीला कळंबोली पोलिसांनी याबाबत कलम 307 न लावता केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांना झुकते माप मिळत होते.
याबाबत 'ईटीव्ही भारत' ने बातमी लावून पीडित तरुणाच्या कुटुंबियांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर कळंबोली पोलीस खडबडून जागे झाले आणि तरुणावर हल्ला करणाऱ्या नगरसेवकाच्या मुलांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. पण घटनेच्या चार दिवसानंतर कलम 307 लावून थंड पडलेले कळंबोली पोलीस नगरसेवक पुत्र आरोपींना दोन आठवड्यानंतर ही अटक करू शकले नाहीत.