रायगड - महाड तळई गावात दरड कोसळली आहे. यात जवळपास ५० ते ६० नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यातील 35 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौैधरी यांनी दिली आहे. या ठिकाणी एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे पथकाला घटनास्थळी पोहचण्यास अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर आज सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे.
जिल्ह्यात विविध तीन घटनांमध्ये लहान मुलींसह तीन जण पाण्यात वाहून गेले आहेत. ही माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
एनडीआरएफ, कोस्ट गार्ड पथक पुराच्या पाण्यात अडकल्याने बचावकार्यास वेळ लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. तरीही पाऊस कमी झाल्यानंतर बचाव कार्य सुरू होईल. पावसाचा जोर अजून सुरू असल्याने बचावकार्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-कृष्णेच्या पाणी पातळीत एका दिवसात 14 फुटांनी वाढ, 35 फुटांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
- अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुंडलिका आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहा आणि महाडमध्ये काही परिसरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर कर्जत शहरात उल्हास नदीचे पाणी सकाळी शिरले आहे.
- जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार महाड शहरातील ५० वर्षीय व्यक्तीचा सावित्री नदीत बुडून मृत्यू जाला आहे. तर कर्जत तालुक्यात ४० वर्षीय व्यक्ती आणि त्याची मुलगी उल्हास नदीत वाहून गेली आहे.
- सावित्री नदीमधून संजय नारखेडे या व्यक्तीला काढले होते. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात मृत घोषित केले आहे. तर दमाड गावामध्ये इब्राहिम मनियार आणि त्यांची मुलगी उल्हास नदीत बुडाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
- रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
- खोपोलीमधील सिद्धार्थनगर आणि प्रज्ञानगर येथील ५३ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहे. तसेच खालापूर तालुक्यातील जमरुगंगा बौधवाडी आणि बिंधकुर्धा गावातील ग्रामस्थांना जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले आहे.
- भोर-महाड मार्गावर वारवाडा गावात भूस्खलनची घटना घडली आहे. त्यामुळे वरंधा घाटावरून होणारी वाहतूक विस्कळित झाली आहे.
हेही वाचा-BIG BREAKING: मोठी दुर्घटना, दरड कोसळली; 400 ते 500 जण अकडल्याची भीती
माथेरानमध्ये सर्वाधिक ३३१.४० मिमी पावसाची नोंद
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यात २४ तासांमध्ये म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत १६५ मिमी पाऊस झाला आहे. तर माथेरानमध्ये सर्वाधिक ३३१.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुरुडमध्ये ४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसाची नोंद ही वार्षिक सरासरी पावसाच्या ७०.३९ टक्के आहे.
यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे.