रायगड - खोपोली मिळगाव येथे राहणारे सोमनाथ आप्पा घाटे व त्यांची पत्नी खोपोली येथील नगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. त्यांच्या सोबत असलेल्या एकाने त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. त्याला शोधून काढण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे.
खोपोली पोलिसांची कामगिरी -
खोपोली पोलिसांनी दोन दिवस शोध मोहीम राबवून ३ ऑगस्ट रोजी त्या लहान मुलाचा शोध घेतला. हा मुलगा आतोनेवाडी ता.सुधागड येथे सापडला असून ३ अॉगस्ट रोजी खोपोली पोलिसांनी त्यांच्या आई वडिलांकडे त्याला सोपवले. खोपोली पोलिसांनी केलेल्या या दबंग कामगिरीचे खालापूरचे डीवायएसपी संजय शुक्ला यांनी कोतुक करत पोलीस टीमचा विशेष सत्कार केला आहे.
खोपोली शिळफाटा येथील मुळगाव धनगरवाडा येथे वास्तव्यात असणारे सोमनाथ आप्पा घाटे व त्याची पत्नी लहान 2 वर्षांचा मुलगा समर्थ हे कुटुंब 10 दिवसांपूर्वी औरंगाबादेतील कामाच्या ठिकाणाहून आले होते. त्यांच्या सोबत एक त्याठिकाणी ओळख झालेला व्यक्ती गजा हा देखील खोपोली येथे येऊन वास्तव्य करत होता. रविवारी सोमनाथ यांच्या पत्नीच्या पोटात दुख असल्याने पती-पत्नी, लहान मुलगा समर्थ व त्याच्या सोबत आलेला गजा हे सर्वजण रिक्षाने खोपोली शहरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी आले. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा समर्थ त्याच्याबरोबर आलेल्या गजाकडे होता. काही वेळानंतर गजाने या समर्थला घेऊन पळ काढला. काही वेळाने ही बाब सोमनाथ घाटे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने आपल्या दोन वर्षाच्या समर्थचा शोध घेतला. मात्र, तो कोठेच सापडला नाही.
सीसीटीव्हीत सर्व प्रकार कैद
सोबत आलेल्या गजाने मुलाला पळवल्याचा टाहो फोडल्याने या ठिकाणी अनेक नागरिक जमा झाले. त्यानंतर ही बाब खोपोली पोलिसांना कळविल्याने तात्काळ रुग्णालयात येऊन माहिती घेतली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात गजा मुलाला घेऊन जाताना दिसत होता.
आईची प्रकृती चिंताजनक
मुलाला नेल्याच्या घटनेमुळे आईची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिच्यावर खोपोली पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, हरवलेल्या समर्थचा अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे खोपोली पोलीस बिट मार्शल, दामिनी पथक व सामाजिक कार्यकर्त्यांचे पथक त्याचा शोध घेत होते.