रायगड - जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी 'शिवभोजन थाळी' योजनेचा शुभारंभ केला. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. अदिती तटकरे यांनी योजनेचा शुभारंभ तर केला मात्र, स्वत: या थाळीची चव घेणे टाळले.
या योजनेमुळे सर्वसामान्य, गरीब आणि गरजूंना दहा रुपयात जेवण मिळणार आहे. शिवभोजन थाळीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला अधिकारी वर्गाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यानंतर पालकमंत्र्याप्रमाणेच त्यांनीही काढता पाय घेतला.
हेही वाचा - मुंबईत जन्मलेला मुख्यमंत्री तुम्हाला मिळाला, मला मुंबईच्या प्रश्नांची जाण - मुख्यमंत्री
त्यापूर्वी सकाळी 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वजरोहणानंतर पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड पोलीस दलाच्यावतीने पालकमंत्री अदिती तटकरे याना मानवंदना देण्यात आली. या संचलनामध्ये पोलीस, महिला पोलीस पथक, दामिनी पथक, बॉम्ब शोधक पथक, दंगल नियंत्रक पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका, होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता.