पेण (रायगड) - तालुक्यातील कोरोना परिस्थितीबाबत खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. मात्र रुग्णांनी घाबरून जाऊ नये. कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा देण्याकरीता शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तालुक्याला व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवठा तातडीने उपलब्ध करून द्यावा. तालुक्यातील ग्रामीण भागातील सबसेंटरसह शहरातील 4 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी. 1 मे रोजी 18 वर्षे वरील वयाच्या सर्वांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. पेण तालुक्यातील गुंजन हॉटेल येथील यश हॉस्पिटल, सावरसई, पेणमधील सिटी हॉस्पिटल, म्हात्रे हॉस्पिटल, डॉ.वनगे हॉस्पिटल येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या प्रत्येक ठिकाणी आरोग्य यंत्रणा उभी राहिली पाहिजे. त्यासाठी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना रुजू करून घ्या, अशा सुचना खासदार तटकरे यांनी पेण येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.
या बैठकीला प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण तहसीलदार डॉ.अरुणा जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे, पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, डॉ. राजीव ताम्हाणे यांच्यासह जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, जि.प.सदस्य डी.बी.पाटील, दयानंद भगत, संतोष शृंगारपुरे, जितेंद्र ठाकूर, विकास पाटील यांच्यासह जे.एस.डब्ल्यू स्टील कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.