रायगड - नववीसह दहावीच्या गुणांचे मूल्यमापन करून दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय चुकीचा असून, या निर्णयामुळे मुलांचे पुढील शैक्षणिक आयुष्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे मुलांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. अन्यथा, दहावीपर्यंतच्या सर्वच मुलांना पास करणार, असा आदेश काढावा, असे स्पष्ट मत डीकेटी शाळेचे चेअरमन अमर वार्डे यांनी व्यक्त केले आहे. ते इटीव्ही भारतशी बोलत होते.
'मुलांचे पुढील शैक्षणिक आयुष्य येणार धोक्यात'
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या नववीच्या गुणांचे मूल्यांकन करून त्यांना मार्क दिले जाणार आहेत. मात्र, यामध्ये हुशार मुलांना चांगलाच फटका बसणार आहे. पुढचे शिक्षण घेताना त्यांना अडचणी येणार आहेत. याबाबत राज्य शासनाने पुन्हा योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत वार्डे यांनी व्यक्त केले.
'दहावी परीक्षेबाबत न्यायालयात याचिका दाखल'
दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाबाबत धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार हे न्यायालयात परीक्षा रद्द केल्याबाबत आपले मत नोंदवणार. यानंतर न्यायालयाने सरकारच्या बाजून उत्तर दिले, तर हा प्रश्न असाच राहणार. आता या निर्णयाविरोधात काही संघटना ह्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये तुम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांची किती परीक्षा पाहणार आहात, असा संतप्त सवालही वार्डे यांनी उपस्थित केला आहे.
'जीआर काढण्यासाठी इतका वेळ कसा लागला'
दहावी परीक्षा रद्द केल्याचे तीन आठवड्यांपूर्वी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. मात्र, शासनाने याबाबत तीन आठवड्यानंतर जीआर काढला. मग इतका वेळ जीआर काढण्यासाठी कसा लागला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
'सरकारला सल्ला देणारे तज्ज्ञ कोण आहेत'
20, 30, 50 असे मार्क कुठून आले. कोणते शिक्षणतज्ज्ञ सरकारला सल्ला देत आहेत. सरकार कुणाचे ऐकत आहे, हे कळत नाही. अनेक शिक्षक सरकार करत असलेले परीक्षेबाबातचे निर्णय चुकीचे आहेत, असे म्हणत आहेत. त्यामुळे सरकारने घेतलेला हा तुघलकी निर्णय मागे घेऊन, दहावीच्या परीक्षा घ्याव्यात. अन्यथा, दाहवीपर्यंत सर्वच पास असे जाहीर करावे, असे मत अमर वार्डे यांनी व्यक्त केले आहे.