रायगड - कोरोनाबाधित असताना कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल बोडणीतील दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग तहसिलदार यांना दिले आहेत. त्यानुसार तहसीलदार सचिन शेजाळ हे मांडवा पोलीस ठाण्यात दोषींविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. पुढील 14 दिवस बोडणी गावाची हद्द ही पूर्णपणे बंद केली जाणार असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दिवसेंदिवस बोडणी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे, तो रोखण्यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस यंत्रणेने पावले उचलली होती. प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी बोडणी गावात जाऊन आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र, बोडणीतील कोरोना पॉझिटिव्ह बाधितांसह ग्रामस्थांनी तहसीलदार, पोलीस, आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांवर धावून येऊन त्यांना पिटाळून लावले. यावेळी बोडणी ग्रामस्थ हे आक्रमक झाले होते.
कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आम्ही घरात राहून उपचार घेऊ आणि शासनाचे, प्रशासनाचे नियम पाळू असे बोडणीतील कोरोना पॉझिटिव्ह बाधितांनी लिहून दिले आहे. असे असतानाही पॉझिटिव्ह बाधितांसह ग्रामस्थांनी कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आणला आहे. प्रशासन हे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी पावले उचलत असताना कोविड 19 नियमांचे उल्लंघन करणे हे गैर आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील 14 दिवस बोडणी गाव हे पूर्ण बंद करण्यात येणार असून, कोणालाही आत किंवा बाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना सांगितले.
बोडणी गावात घडलेल्या या प्रकारामुळे महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, अधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ हे पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. तसेच आता बोडणी गावात कोणी आजारी पडल्यास आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी जाण्यास धजावणार नसल्याने गावातील कोरोनाचा प्रसारही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.