रायगड - आपण केलेले एक काम दाखवा आणि २ हजार घ्या, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या अनंत गीते दिले आहे. आपण रिंगणात येऊन रायगडमध्ये केलेल्या कामाच्या आराखड्याची माहिती एकत्र व्यासपीठावर येऊन द्या, अन्यथा मी ३० वर्षांत काय केले आहे, याची माहिती देण्यासाठी आपण बोलवाल त्या ठिकाणी येण्याची माझी तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले. अलिबाग शहरातील काँग्रेस भवनमध्ये आघाडीचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात अनंत गीते यांच्यावर टीका केली.
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुरुंगात टाकण्याची भाषा करीत असताना माझ्या उमेदवारी अर्जावर कोणतेच आक्षेप गीते यांनी का घेतले नाही ? असा सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातून गेलेले मंडळी आज गीतेंना अलिबागमध्ये काँग्रेस नेत्यांची भेट घेण्यास सांगत आहेत. मात्र काँग्रेसचे नेते, पदाधिकारी हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. ९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्याआधी आपण आपल्या कामाची माहिती द्या, असे आव्हान सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना जाहीर सभेत केले.
सुनील तटकरे म्हणाले, की माणिक जगताप, मधुकर ठाकूर आणि मी आपल्या राजकीय जीवनात अनेकांना आजारपणात मदत केली आहे. मात्र आपल्या कार्यअहवालात कधीही कोणाला काय मदत केली याबाबत लिहिलेले नाही. मात्र अनंत गीते यांनी एका व्यक्तीला केलेल्या मदतीबाबत त्याचे नाव, पत्ता, केलेली मदत याची माहिती कार्य अहवालात दिली. त्यामुळे अनंत गीते यांना मतांसाठी लाचारी पत्करावी लागत आहे, अशी टीका तटकरे यांनी गीतेंवर केली आहे.