रायगड - रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी चार हजार पाचशे कोटी खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. रेवस-रेड्डी महमार्गाचा डीपीआर बनवण्यासाठी कन्सल्टंट नेमण्यात आला असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग बनवण्याचे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी पाहिले होते. त्यांच्या या स्वप्नाला महाविकास आघाडी सरकार मूर्तरूप देणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग विकासाची दालने खुली करणारा ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून कोरोनाचे संकट असतानाही महामार्गासाठी निधीची पूर्तता शासनाकडून करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
रेवस रेड्डी सागरी महमार्गाचा डीपीआर बनवण्यासाठी शासनाकडून कन्सल्टंट नेमण्यात आला आहे. हा महामार्ग रेवस करंजा, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, दिघी, दिवेआगर, शेखाडी, श्रीवर्धनमार्गे रत्नागिरीत रेड्डी असा असणार आहे. त्यामुळे सागरी मार्गावरील अनेक गावांचा विकास यानिमित्ताने होणार आहे. रेवस रेड्डी महामार्गामुळे पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. दोन वर्षांत हा महामार्ग पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे रायगडपासून तळ कोकणात विकासाची दारं खुली होणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.