रायगड - अनंत गीते यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सैरभैर झाल्याची टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. तसेच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हे शिवसेनेची बी टीम असल्याचे ते म्हणाले. राज्यात पुन्हा आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
म्हसळा तालुक्यातील पाबरे येथे जाहीर सभेत बोलताना खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत रोहा येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी शिवसेना नेते अनंत गीते यांच्यावर निशाणा साधला. माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एका प्रचारसभेस दरम्यान टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पवार साहेब असा उल्लेख करतात; असे असतानाही गीते यांनी शरद पवार यांच्या विरोधात केलेली टीका म्हणजे ते सैरभैर झाल्याचे उदाहरण आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
ते राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी काही लोकांना व्यक्ती व्देशाने पछाडले असून, त्यांनी मतदारसंघात बंडखोरी केल्याचे तटकरे म्हणाले. तसेच हे तिघेही शिवसेना पुरस्कृत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
लोकसभेतील पराभवामुळे अनंत गीते व्यथित झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप करत सुटले आहेत, असे तटकरे म्हणाले. मतदारसंघात निष्क्रीय राहिल्यानेच रायगडकरांनी त्यांचा पराभव केल्याचे मत त्यांनि व्यक्त केले.
नारायण राणे रोखठोख स्वभावाचे आहेत. नव्या पक्षात गेल्यानंतर कोणती बंधने येतात, हे त्यांना लवकरच कळेल असे तटकरे यांनी नारायण राणे यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत वक्तव्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते भास्कर विचारे, म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर, अल्पसंख्यांक सेलेचे उपाध्यक्ष अली कौचाली, फैसल शेख आदी उपस्थित होते.