रायगड - नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या उमरठ येथील दुर्लक्षित स्मारकाबाबत ईटीव्ही भारतने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्मारकाचे सुशोभीकरण, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, निवास व्यवस्था, स्मारकाकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच आमदार भरत गोगावले यांनी उमरठला 'ब' दर्जा मिळविण्यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जिल्ह्यातील उमरठ हे गाव नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी आणि समाधीस्थळ आहे. उमरठ येथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी हे स्मारक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधले. या स्मारकाची सध्या दुरवस्था झाली असून याबाबत ईटीव्ही भारतने प्रकाश टाकला होता. त्यानंतर जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेले वृत्त - उमरठ येथील तानाजी मालुसरेंचे स्मारक दुर्लक्षित, सरकार आता तरी देणार का लक्ष?
'तान्हाजी द अनसंग वॉरीयर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर उमरठकडे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाला आणि समाधी स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटकांची रीघ वाढली आहे. मात्र, स्मारक परिसर हे दुरवस्थेत असून परिसरात गवत वाढले आहे. काही भाग कोसळलेला आहे. तसेच याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सुविधा या मूलभूत सुविधा नसल्याने पर्यटकांना असुविधेला सामोरे जावे लागत आहे.
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुभेदार होते. कोंढाणा किल्ला सर करताना त्यांना वीरमरण आले. अशा या शूरवीर योद्ध्याचा इतिहास असलेल्या उमरठ गावातील स्मारकाची दुरवस्था झालेली असताना जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. याबाबत ईटीव्ही भारतने प्रकाश टाकल्याने आता स्मारकाचे सुशोभीकरण, स्मरकाकडे जाणारा रस्ता दुरुस्तीसाठी तसेच स्वच्छतागृह, पाणी या सुविधा पुरविण्याबाबत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी आणि समाधी स्थळ असलेले उमरठ हे गाव 'क' दर्जाच्या पर्यटन स्थळात मोडत असून त्याला 'ब' दर्जा मिळविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव केला आहे. तसेच समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले असून 17 फेब्रुवारीला तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करणार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी ईटीव्ही भारतबरोबर बोलताना सांगितले.