रायगड - अलिबाग मुरुड विधानसभा हा पुरोगामी विचारांचा मतदारसंघ आहे. तो टिकवून ठेवण्यासाठी मी पुन्हा पक्षाचे नेतृत्व करत असल्याची प्रतिक्रिया शेकापचे विद्यमान आमदार व उमेदवार सुभाष पंडित-पाटील यांनी दिली. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापचे विद्यमान आमदार पंडित पाटील यांनी सोमवारी वाजत-गाजत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्याकडे दाखल केला.
शेकापतर्फे विद्यमान आमदार पंडित पाटील यांना पुन्हा अलिबाग विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. शेतकरी भवन येथून भव्य रॅली काढून पक्षातर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी शहरात सगळीकडे लाल बावट्याचे झेंडे दिसत होते. अरुणकुमार वैद्य विद्यालयाजवळ या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मनोज भगत, नगरसेवक, राजीप सदस्य, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - खटला मागे घेण्यासाठी विनंती करणाऱ्या तरुणांवर तक्रारदाराच्या गुंडांचा हल्ला
सभेनंतर पंडित पाटील यांनी दुपारी 2 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कबन नाईक, मनोज भगत हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून 100 मीटर पर्यंतच्या रस्त्यावर बॅरिकेटस लावण्यात आले होते. पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा - महाड विधानसभा आढावा: पुन्हा रंगणार गोगावले विरुद्ध जगताप सामना