रायगड - एलईडी मच्छीमारीमुळे समुद्रातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्याचे शासन निर्णय काढले असूनही घातक मच्छीमारी अजूनही सुरूच आहे. पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या कोळी बांधवांनी याविरोधात आवाज उठविला आहे. 3 जानेवारीला साखरआक्षी अलिबाग खाडीमध्ये एक हजार मच्छीमार बोटी बंद करून निषेध मोर्चा काढणार आहेत. शासनाने यावर योग्य निर्णय न घेतल्यास राज्यस्तरीय आंदोलन 29 जानेवारीला भरसमुद्रात करणार असल्याची माहिती राजीप सदस्य दिलीप भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अलिबाग येथील तुषार विश्रामगृह येथे जिल्ह्यातील कोळी बांधवांतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राजीप सदस्य दिलीप भोईर, रायगड जिल्हा कोळीसमाज संघ अध्यक्ष धर्मा घाबरट, राज्य सरचिटणीस संजय कोळी, मोतीराम पाटील तसेच सर्व मच्छीमार संघाचे चेअरमन, सदस्य, कोळी बांधव उपस्थित होते.
एलईडी, पर्सनीट, बुलनेट या अनधिकृत मच्छीमारीला बंदी असताना काही मच्छीमार या अवैधपणे समुद्रात मासेमारी करत आहेत. एलईडी मासेमारीमुळे मोठ्या मच्छीसह छोटे मासे, जीवजंतू हे सुद्धा जाळ्यात येतात. त्यामुळे समुद्रात माशाची व्याप्ती कमी झाली आहे. एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळीबांधवाना मासे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
एलईडी मासेमारीवर शासनाने कडक निर्णय केले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मत्स्य विभागला दिलेले आहेत. मात्र, असे असतानाही एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर कोणतीही कायमस्वरूपी कारवाई केली जात नसल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत कोळी बांधवांनी केला आहे. एलईडी मासेमारी ही पूर्णतः बंद करण्याबाबत वारंवार कोळी बांधवाकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अधिकारी वर्ग शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करताना दिसत नाही असेही म्हणणे या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी मांडले.
पारंपरिक मच्छीमार एलईडी अवैध मासेमारीमुळे हैराण झाला आहे. त्यातच अवेळी पावसाने मच्छीमारांचे आधीच कंबर मोडली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार कुटूंबाना उपासमारीची वेळ आली असून कोळी बांधवही भविष्यात आत्महत्या करू शकतो. शेतकऱ्याना जशी मदत दिली जाते तशी मदत कोळी बांधवानाही द्यावी अशी मागणी पत्रकार परिषदेनिमित्त करण्यात आली.
एलईडी मासेमारीला समुद्रात बंदी आहे. एलईडी मासेमारी बंद व्हावी यासाठी कोळी बांधव 3 जानेवारीला खाडीत आंदोलन करणार आहेत. एलईडीसोबत पर्सनेट मासेमारीवरही बंदी आहे. मात्र, पर्सनेट मासेमारी बाबत जिल्ह्यातील कोळी बांधवांची भूमिका परस्पर वेगळी असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.