रायगड - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तौक्ते चक्रीवादळ निर्माण झाले आहे. कर्नाटकमधून हे वादळ रायगडाच्या समुद्रात 16 मे रोजी सायंकाळपर्यंत धडकणार असल्याचे जिल्हा आपत्ती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर मच्छीमार बांधवानाही समुद्रात जाण्यास बंदी घातल्याने हजारो बोटी समुद्रकिनारी लागलेल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश
3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ झाले होते. यावेळी जिल्ह्यात हजारो कोटींचे नुकसान झाले होते. त्यामुळे समुद्रात सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून समुद्र तसेच खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत.
हजारो मच्छीमार बोटी लागल्या किनाऱ्याला
तौक्ते चक्रीवादळ हे समुद्रात होत असल्याने समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमार बांधवाना खोल समुद्रात मच्छीमारीला जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हजारो बोटी ह्या समुद्रकिनारी विसावल्या आहेत.
जमिनीवर वादळाचा फटका नाही
तौक्ते चक्रीवादळ हे समुद्रातूनच पुढे सरकत आहे. त्यामुळे जमिनीवर वादळाचा फटका जास्त बसणार नाही. तशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी भागाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. समुद्रात वादळ असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात सूचना
चक्रीवादळ निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात काही भागात पाऊस पडणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाल्यास कच्ची घरात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना होम आयसोलेट असणाऱ्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.