रायगड - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशू कक्षात आग लागून 10 बालकांचा नाहक बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. त्यानंतर राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही एसएनसीयू केअर युनिटमध्ये वीज, वातानुकूलित यंत्रणा सुस्थितीत आहे का याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे. बालकाच्या आणि रुग्णालयातील रुग्णाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे.
एसएनसीयू कक्ष आठ वर्षांपासून कार्यन्वीत
अलिबाग येथील जिल्हा सामान्य आठ वर्षांपूर्वी अत्याधुनिक, शीत सोयीनुसार एसएनसीयू कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या कक्षात नवजात झालेल्या अतिदक्ष बालकांवर उपचार केले जातात. एकावेळी 12 बालकांवर उपचार करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. कक्षात इन बॉर्न म्हणजे रुग्णालयात प्रसूती झालेले बालक, आऊट बॉर्न कक्षात बाहेरून उपचारासाठी आलेले बालक आणि स्टेप डाऊन उपचार घेऊन बरे झालेले बालक कक्ष, असे कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.
दिवस-रात्र परिचारिका आणि कर्मचारी आहेत कार्यरत
एसएनसीयू कक्षात दिवस-रात्र परिचारिका आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली जात आहे. रात्र पाळीत एक परिचारिका आणि दोन कर्मचारी असतात. बाळांची संख्या जास्त असल्यास दोन परिचारिका कर्तव्यावर असतात. सध्या एसएनसीयू कक्षात 10 बालके असून 6 पुरुष तर 4 महिला वर्गातील बालकांवर उपचार सुरू आहेत.
एसएनसीयू कक्षात करून घेतली तपासणी
भंडारा येथील घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयू कक्षातील वीज यंत्रणा, वातानुकूलित यंत्राची तपासणी वीजतज्ज्ञांमार्फत शनिवारी (दि. 9 जाने.) करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. बाळांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना रुग्णालयात घेतल्या जात आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी म्हटले आहे. आग नियंत्रण यंत्रणाही योग्य पद्धतीने कार्यन्वित आहे.
हेही वाचा - 300 फूट दरीत कोसळला वऱ्हाडाचा ट्रक; तीन ठार, 64 जखमी
हेही वाचा - रायगड जिल्ह्यात चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन सुरू