रायगड - राज्यात कोरोनाचे संकट अद्यापही आहेच. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने संचारबंदी लागू आहे. रायगड जिल्हा हा कोरोना पॉझिटिव्हीटी सरसरीत चौथ्या फेजमध्ये आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानदारांना दुकाने उघडण्यास बंदी आहे. कोरोनाच्या या संकटात छोटे दुकानदार हे मेटाकुटीस आले आहे. कोरोना कमी होण्याचे नाव घेत नाही आणि दुकाने काही उघडण्याची परवानगी मिळत नसल्याने जिल्ह्यातील छोटे दुकानदार हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ईटीव्ही भारतने याबाबत घेतलेला हा आढावा..
दीड वर्षात सहा महिनेच दुकाने होती खुली
मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झाला. त्यानंतर सहा महिने शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले. सप्टेंबर 2020 पासून हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यानंतर शासनाने संचारबंदीच्या नियमात शिथिलता दिली. त्यानंतर पुन्हा व्यवहार सुरू झाले. बाजारपेठा ग्राहकांनी बहरू लागल्या. छोटे दुकानदार व्यवसायिक यांनाही काहीसा दिलासा मिळाला. मात्र पुन्हा सहा महिन्यानंतर मार्च 2021 पासून कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लागू झाली संचारबंदी. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. मृत्यू संख्याही वाढू लागली. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकाने व्यतिरिक्त इतर दुकानांना उघडण्यास बंदी करण्यात आली. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांना सहा महिनेच दुकाने खुली ठेवून व्यवसाय करता आला.
छोट्या दुकानदारांची आर्थिक घडी विस्कटली
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्हा हा चौथ्या फेजमध्ये आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र जनरल स्टोअर, भांडी, कपडे, सोने, स्टेशनरी, नॅाव्हेल्टी, मोबाईल यासारखे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. या दुकानदारांना कोरोनाच्या या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. लग्नसराई, सण यावेळी सुद्धा व्यवसाय बंद होते. परवानगी शिवाय दुकाने खुली ठेवायची तर स्थानिक प्रशासनाकडून दंड आकारण्याची भीती. त्यामुळे दुकाने बंद असल्याने घरखर्च, कर्जाचे हफ्ते, व्यापाऱ्याचा पैशासाठी तगादा यासारख्या समस्या या छोट्या दुकानदारांना जाणवू लागल्या आहेत.
दुकाने उघडण्याची परवानगी द्या - विक्रेते
कोरोनाच्या या संकटात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकानदार पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. एकीकडे शासनाच्या नियमाचे ओझे तर दुसरीकडे बंद दुकानातून उत्पन्न कसे काढायचे ही चिंता. कोरोनाचे सर्व नियम पाळण्याची व्यावसायिकांची तयारीही आहे. त्यामुळे प्रशासनाने दुकाने उघडण्याची परवानगी द्या, अशी आर्त विनवणी व्यावसायिक करीत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत या व्यवसायिकांची आर्थिक कुचंबणा सुरूच राहणार हे मात्र नक्की.
हेही वाचा - वर्षाच्या अखेरीस प्रधानमंत्री मोदी अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता