रायगड - गड-किल्ले चढताना भल्याभल्यांची भंभेरी उडते. मात्र शर्वीका जितेंन म्हात्रे या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीने आतापर्यंत अनेक किल्ले सर केले आहेत. नुकताच तिने नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील साल्हेर हा राज्यातील सर्वात उंच किल्ला सर केला आहे. तिने केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डने दुसऱ्यांदा घेतली आहे. शर्वीकाच्या या कामगिरीने अलिबागसह जिल्ह्याचे नाव देशभरात उंचावले आहे. शर्वीका म्हात्रे या चिमुकलीची खास मुलाखत ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी देत आहोत.
शर्वीका ही दिड वर्षांची असल्यापासून गड किल्यावर जात आहे. शर्वीकाचे वडील जितेन आणि अमृता म्हात्रे हे दोघेही शिवभक्त असून सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेचे सदस्य आहेत. त्यामुळे दर शनिवारी आणि रविवारी ते गड किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असतात, त्यातूनच शर्वीकाला गड-किल्ल्याची आवड निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जन्म, गडांची नावे, राजमुद्रा याबाबत तीला पूर्ण माहिती आहे. आता शर्वीकाला महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाईचे शिखर सर करायचे आहे.