रायगड - निसर्ग चक्री वादळात जिल्ह्यातील नारळी पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. बागायतदार हवालदिल झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रोठा सुपारी ही जगप्रसिद्ध असून बाजारात या सुपारीला प्रचंड मागणी आहे. मात्र, वादळात रोठा सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली असल्याने रोठा सुपारीचे अस्तित्व टिकवण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याच्या कृषी विभागाच्या सहकार्याने रोठा सुपारीची नवीन रोपे तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
3 जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका बागायतींना बसला. यात बागायतदारांचे नुकसान झालेच. परंतु, श्रीवर्धनची जगप्रसिद्ध रोठा सुपारी धोक्यात आली आहे. उद्ध्वस्त झालेल्या बागांमध्ये आता नव्याने रोपांची लागवड करणे गरजेचे आहे. परंतु, रोठा सुपारीची रोपे उपलब्ध नाहीत. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्रात जेमतेम 4 हजार रोपे शिल्लक आहेत. वादळाने झालेले नुकसान पाहता ही रोपे लागवडीसाठी खूपच अपुरी आहेत. आताच्या घडीला किमान सुपारी लागवड करण्यासाठी लाखभर रोपांची गरज आहे.
...तर रोठा सुपारीचे अस्तित्व धोक्यात -
गरज ओळखून शेतकऱ्यांना रोठा सुपारीची नवीन रोपे उपलब्ध करून देण्याचा कृषी विभाग आणि विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या संदर्भात श्रीवर्धन येथे एक बैठकही पार पडली. या बैठकीला कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, कृषी विभागाचे अधिकारी, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. सध्या विद्यापीठाकडे आणि शेतकऱ्याकडे जी सुपारीची झाडे वाचलेली आहेत किंवा जी वाचवता येऊ शकतील, अशा झाडांपासून जास्तीत जास्त सुपारी मिळवून त्यांची नवीन रोपे तयार केली जाणार आहेत. ही रोपे बागायतदारांना पुरवली जाणार आहेत. इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून सुपारीची रोपे आणून लागवड केली, तर श्रीवर्धनची ओळख असलेल्या रोठा सुपारीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे इथल्याच सुपारीची जास्तीत जास्त रोपे तयार करून घेतली जाणार आहेत.
रोठा सुपारीची आशियाई देशात मोठी मागणी -
श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वरपासून दिवे आगरपर्यंत साधारण 300 हेक्टर क्षेत्रावर रोठा सुपारीची लागवड केली जाते. ही सुपारी इतर सुपारीच्या तुलनेत मोठी असते. शिवाय फळांच्या आतील सफेद भाग जास्त मऊ असतो. यात साखरेचे प्रमाण 2 टक्के असते. त्यामुळे ती चवीला गोड असते. महत्वाचे म्हणजे ही सुपारी खाल्ल्यानंतर त्याची झिंग येत नाही. यामुळे या सुपारीला राज्याच्या अनेक भागांबरोबरच आशियाई देशांमध्ये मोठी मागणी आहे.
परागीभवनातून सुपारीची निर्मिती -
सध्या रोठा सुपारीच्या रोपांची खूपच कमतरता आहे. सुपारीची फळनिर्मिती ही परागीभवनातून होत असते. जर अन्य जिल्हा किंवा राज्यातून रोपे आणून त्यांची लागवड केली, तर मूळ रोठा सुपारीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे. शिवाय चव बदलण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन मूळ रोठा सुपारीची रोपे तयार करून ती शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहेत.