रायगड- अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत अलिबागवर पहिल्यांदाच भगवा फडकवला आहे. महेंद्र दळवी यांना 111047 मते मिळवली तर शेकापचे विद्यमान आमदार सुभाष (पंडित) पाटील यांना 78086 मते मिळाली असून त्यांचा 32611 मताने पराभव केला. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकूर यांना 11853 तर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांना फक्त 2511 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी महेंद्र दळवी विजयी झाल्याचे घोषित केले. महेंद्र दळवी यांच्या विजयानंतर अलिबाग तालुका हा भगवामय झाला असून शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारले होते.
अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा 1952 पासून शेकापचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसने 4 वेळा तर शेकापने 9 वेळा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. शिवसेनेला या मतदारसंघात एकदाही विजय संपादन करता आला नव्हता. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र दळवी यांना 16 हजाराने पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी 32 हजाराचे मताधिक्य घेऊन दळवी हे विजयी झाले. विजयानंतर महेंद्र दळवी यांची भव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली. बऱ्याच वर्षांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकावर विधानसभेचा गुलाल अंगावर उडाल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे