रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा 346 वा शिवराज्यभिषेक सोहळा आज (6 जूनला) स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याची रायगडावर पूर्वतयारी झाली आहे. शिवराज्यभिषेक सोहळा डोळ्याने पाहण्यासाठी लाखो शिवभक्त रायगड किल्ल्यावर आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा आज रायगड किल्ल्यावर संपन्न होत आहे. या सोहळ्याला खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले तसेच पाच देशाचे राजदूत यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवराज्यभिषेक सोहळ्याची पूर्व तयारी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी स्वत: ल७ गातले होते. रायगड किल्ल्यावर राजसदरेवर फुलांची आरास, मंडप, रांगोळी याची जोरदार तयारी केली आहे. तर होळीच्या माळरानावर मैदानी कवायतीचे खेळ उपस्थितांसमोर सुरू झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा राज्यभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यातून तसेच बाहेरून लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावर आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.