अमरावती - शेतकऱयांना कर्जमाफी आमच्या युती सरकारने केली. शिवसेना आतासुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले. यावेळी दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना मदत कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अमरावतीच्या तिवसा येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी पीक विमा केंद्र उभारण्यात आले आहे. आज रविवारी दुपारी रावते यांनी या केंद्राला भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना पीक विमा संरक्षण व आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आली. त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा तक्रारी प्राप्त करून त्या तात्काळ सोडवण्यात येतील. आणि त्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यासाठीच हे पीक विमा केंद्र उभारण्यात आले आहे, असे दिवाकर रावते यांनी सांगितले.
अमरावती येथून नागपूरकडे जात असतांना तिवसा येथे दिवाकर रावते यांनी पीक विमा केंद्राला भेट दिली. आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत सरकारच्या योजना येथील शेतकऱ्यांना सांगितल्या. शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पीक विमा केंद्रात शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे काम शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहे.