रायगड - पेण तालुक्यात झालेल्या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शेकापने सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवले आहे. तालुक्यातील कामार्ली, वाकरूल, आंबेघर, जोहे, खारपाले, बोर्झे व काळेश्री या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कामार्ली, वाकरूल, आंबेघर, जोहे, कालेश्री या सहा ग्रामपंचायतींवर शेकापने वर्चस्व मिळवले असून, खारपाले ग्रामपंचायत ही आघाडीने जिंकली आहे.
हेही वाचा - खंडाळा घाट खुनावतोय पर्यटकांना, राचमाची पॉईंट गजबला
धैर्यशील पाटील विरुद्ध रविशेठ पाटील यांच्यात होती लढत
या अगोदरच कामार्लीमध्ये 10, वाकरूल 5, आंबेघर 3, खारपाले 8 येथील उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र, जोहे कालेश्री बोर्झे येथे सर्व जागांसाठी निवडणूक झाली. शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्यात लढत होती. निवडणुकीत शेकापने वर्चस्व ठेवल्याने पेणमध्ये सात पैकी सहा ग्रामपंचायती शेकापने जिंकून लालबावटा फडकवला आहे.
विजयी उमेदवारांचे अभिनंदन
यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, जि.प. सदस्य प्रमोद पाटील, प्रभाकर म्हात्रे, कृषी सभापती शरद ऐरूणकर, पं.स. सभापती सरीता म्हात्रे, चिटणीस संजय डंगर, डी.एम. म्हात्रे, सुरेश पाटील, राजा पाटील आदींनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यानंतर विजयी उमेदवारांचे शेकाप कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
सर्वसामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष - धैर्यशील पाटील
2019 विधानसभेच्या निवडणुकीत शेकापला जरी हार मानावी लागली असली, तरी शेकापच्या कार्यकर्त्यांनी एक वर्षाच्या आतच आपले वर्चस्व या निवडणुकीत दाखवून दिले. म्हणून पेण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शेकापने वर्चस्व ठेवले असल्याने सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने लढणारा पक्ष हा शेकापच असल्याचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींवर भगवा, महाविकास आघाडीचीही विजयी घोडदौड