रायगड - जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका हद्दीत 6 तर खालापूर तालुका 1 नवीन रुग्ण आढळला आहे. तर, खालापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून खोपोलीतील 63 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 77 झाली आहे. पनवेलमधील एका 53 वर्षीय पोलीस रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 27 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 47 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. पनवेलमध्ये रविवारी सहा रुग्ण आढळले आहेत. तर, खालापूर तालुक्यात खोपोलीमध्ये एक 63 वर्षीय महिला पॉझिटिव्ह सापडली आहे. ही महिला पनवेलमध्ये नातेवाईकाला रुग्णालयात भेटण्यास गेली होती. त्यामध्ये व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे या महिलेची तपासणी करून नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यानुसार या महिलेचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात पनवेल महानगरपालिका हद्दीत 34, पनवेल ग्रामीण 4, उरण 4, श्रीवर्धन 2, कर्जत 1, पोलादपूर 1, खालापूर 1 असे 47 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. तर, श्रीवर्धनमधील तीन जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 27 जणांनी कोरोनाला हरविले आहे.