रायगड- गणेशाच्या आगमनाच्या मुहूर्तावर भाऊचा धक्का ते मांडवा रोरो बोटसेवा 20 ऑगस्ट पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांना या बोटसेवेचा लाभ मिळणार आहे. रोरो बोटीने येण्यासाठी बुकिंग सुविधा कंपनीने सुरू केली आहे. ही रोरो बोटसेवा 20 ते 30 ऑगस्ट पर्यत सुरू केली जाणार असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे. भाऊचा धक्का आणि मांडवा येथून दिवसातून एक वेळ ही सेवा सुरू राहणार आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा ही बहुप्रतिक्षित रोरो बोटसेवेचे फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. कोरोना प्रादुर्भाव राज्यात वाढू लागल्याने सुरु होण्या आधीच ही रोरो बोटसेवा बंद झाली. त्यामुळे पुन्हा रोरो बोटसेवा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली होती. गणेशोत्सवानिमित्त कंपनीने 20 ऑगस्ट पासून रोरो बोटसेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 ते 30 ऑगस्ट पर्यत ही रोरो बोटसेवा सुरू राहणार आहे
20 ते 30 ऑगस्ट रोजी भाऊचा धक्का येथून सकाळी सव्वा नऊ ते साडेदहा या वेळेत मांडवा दरम्यान सुटणार आहे. मांडवा येथून 20 ते 30 ऑगस्ट दरम्यान दुपारी 4 ते 6 वाजेपर्यत मुंबईकडे रवाना होणार आहे. प्रवाशांना अॅडव्हान्स बुकिंगसाठी करायचा असल्यास कंपनीला संपर्क सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क करायचा आहे.
प्रवाशांसाठी हे राहणार दर
प्रत्येकी प्रवासी 300 रुपये, पाळीव प्राण्यांसाठी 300 रुपये, लहान कार 800 रुपये, मध्यम कार 1000 रुपये, मोठी कार 1200 रुपये, दुचाकी 200 रुपये तर सायकल साठी 100 रुपये तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.