रायगड : अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अहोरात्र पडणाऱ्या पावसामुळे पनवेल व उरण तालुक्यातील भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
यंदाचे वर्ष पावसासाठी विक्रमी ठरले. जुलैच्या अखेरीस सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर शेवटपर्यंत पडतच आहे. त्यामुळे पनवेल-उरण परिसरात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन दिवसांपासून दररोज कोसळणाऱ्या पावसामुळे हाती आलेले पीक वाया जात आहे. यावर्षी भातशेतीसाठी पूरक परिस्थिती नव्हती. त्यात संततधार पावसामुळे भात लावणीचा काळ पाण्यात गेला. त्यानंतरही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक जगवले. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कापणीला आलेली उभी पिके आडवी झाली आहेत.
सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी भाताची कापणी केली होती. कापणीनंतर भात सुकवण्यासाठी घातला असता पावसामुळे तो भिजला. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीत कापलेला भात कणग्यात गोळा गेला, मात्र दोन ते तीन दिवस सलग भिजल्यामुळे पिकाला बुरशी लागल्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात भाताचे उत्पादन घटण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान पाहता, शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीही शेतकरी करत आहेत.
हेही वाचा : सोलापूर महापूर भीषणता:14 जणांचा मृत्यू;570 गावे उद्धवस्त