रायगड - जिल्ह्यातील विविध नागरिक, महिला आणि जिल्ह्यात येणारे पर्यटक यांचा पोलिसांविषयी असणारा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले. जिल्हा पोलिसांच्या हातात जिल्हा सुरक्षित असल्याचा अहवाल समोर आला आहे. सतरंगी सामाजिक गटातर्फे 15 विद्यार्थ्यांनी हे अभ्यास संशोधन केले. सतरंगी सामाजिक संस्थेने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे हा अहवाल सादर केला.
जिल्ह्यात समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, मंदिरे ही मुख्य पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांच्या आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी जिल्हा पोलीस दलावर असते. राजकीय परिस्थिती, गुन्हेगारी यांचाही भार पोलिसांवर असतो. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, पेण, कर्जत, खोपोली या सात तालुक्यातील स्थानिक नागरिकांना भेटून विद्यार्थ्यांनी माहिती गोळा केली. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडूनही पोलिसांबाबत माहिती घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी, अधिकारी हे आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याचा प्रतिसाद त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत कला संगीत महोत्सवाला दिमाखात सुरूवात
स्थानिक पातळीवर कायदा सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा सुचवणे हे, या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या उपक्रमात रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे सुरक्षेविषयी असलेले मत जाणून घेतले, अशी माहिती अभ्यास संशोधन प्रकल्पाचे प्रमुख प्राध्यापक अमेय महाजन यांनी दिली.
थेट सामान्य नागरिकांचा रायगड पोलिसांबद्दल असलेला दृष्टीकोन समजण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या अभ्यास गटाने पोलीस दलाला काही शिफारशी सुचवल्या आहेत. सुचवलेल्या शिफारसी भविष्यात सामान्य नागरिक आणि रायगड पोलीस यांच्यात सुसंवाद वाढवण्यास निश्चित फायद्याच्या ठरतील, असा विश्वास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी व्यक्त केला.