रायगड - उरणमधील सारडे जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थीनींनी परिसरातील झाडांना राख्या बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. विविध उपक्रमातून संदेश देण्याचे काम या शाळेचे प्रयोगशील शिक्षक नेहमीच करत असतात. यावर्षी निसर्गालाच आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवून निसर्ग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, हे नागरिकांना पटवून दिले आहे.
आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश -
शालेय जीवनापासूनच निसर्गाचं आपल्या जिवनचक्रातील महत्व पटवून दिल्यास मोठ्याप्रमाणात निसर्ग संवर्धन होण्यास मदत होईल, या भावनेतून उरणमधील सारडे जिल्हापरिषद शाळेने एक आगळा वेगळा कार्यक्रम करून नागरिकांना संदेश दिला आहे. कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. मात्र, या शाळेतील विद्यार्थिनींनी एकत्र येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. या दिवशी या विद्यार्थिनींनी परिसरातील झाडांना राख्या बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. यातून आपल्या जीवनात निसर्ग आणि वनराई किती महत्वाची आहे. हा बोलका संदेश येथील नागरिकांना मिळाला आहे. नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सारडे जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक विविध प्रयोगातून संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात.
निसर्ग अथवा त्याप्रती आदर भावना मुलांना लहानपणापासूनच रुजवली तर भविष्यात विकासासोबत निसर्ग देखील समतोलीत राहील. यामुळे विद्यार्थी दशेतच मुलांवर अशाप्रकारचे संस्कार घडणे गरजेचे असल्याचे मत येथील शिक्षकांचे असून, त्या प्रकारचे उपक्रम नेहमीच सारडे जिल्हापरिषद शाळा आणि येथील शिक्षक राबवर असतात. मात्र, कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थी या सर्व कार्यक्रमांपासून वंचित राहिले असल्याची खंत देखील कौशिक ठाकूर या शिक्षकाने व्यक्त केली आहे.