रायगड - कोरोना काळात अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आता रायगड जिल्हयातील शिक्षक संघटनांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेच्या रायगड शाखेच्यावतीने जिल्ह्यातील रुग्णालयात आवश्यक आरोग्यविषयक साहित्याबरोबरच इतर साहित्यांचे वितरण करण्यात आले.
शिक्षकांनी गोळा केले 4 लाख रुपये-
समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून शिक्षक परिषदेने कोरोनाच्या गंभीर स्थितीत आपला खारीचा वाटा उचलला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष संजय निजापकर यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मग शिक्षकांनी आपल्याला जमेल तशी रक्कम यासाठी मदत म्हणून ऑनलाइन जमा केली. यातून जवळपास 4 लाख रूपये गोळा झाले. यातील सर्वाधिक मदत महाड व माणगाव तालुक्यातून गोळा झाली आहे.
विविध साहित्याचे केले वाटप
या रकमेतून संघटनेच्या सदस्यांनी स्थानिक स्तरावरील कोविड सेंटर, आरोग्य केंद्राना भेटी देऊन तेथील स्थानिक परिस्थिती व गरज लक्षात घेवून नियोजन केले. या ठिकाणी पंखे, ऑक्सिजन कनेक्टर, राऊटर, एन 95 मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, ग्लोव्ज, औषधे, इंजेक्शन्स, फेस शिल्ड, पीपीई कीटस आदिंचे वितरण करण्यात आले. महाड नगरपालिकेच्या ऊर्दू शाळेतील शिक्षक टेटविलकर यांनी स्वखर्चाने पीपीई कीट उपलब्ध करून दिले. पनवेल येथील धनराज विसपुते यांनीदेखील विविध साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
रोजगार गेलेल्या व्यक्तीच्या मुलांसाठी केली शिक्षक परिषदेने मदत
कोरोना काळात रोजगार गेलेल्या व्यक्तींची जी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या मुलांना शिक्षक परिषदेचे पदाधिकारी यांनी स्वतः किंवा इतर संस्थांच्या मदतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले आहे. त्यामुळे या कुटुंबांवरील खूप मोठा भार हलका झाला आहे. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासतो आहे. रक्तदान करा या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेतर्फे महाड येथे रकतदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 150 पिशव्या रक्त या शिबिरात गोळा करण्यात आले.
समाजातील गरजूना फायदा मिळावा हा उद्देश - राजेश सुर्वे
शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. आजवर समाज या घटकाचे अनुकरण करत आला आहे. राष्ट्रहित, शिक्षण हित, विद्यार्थी हित, शिक्षक हित हे परिषदेचे ब्रीद वाक्य आहे. त्याला अनुसरून आम्ही आमच्या शक्तीनुसार मदतीचा खारीचा वाटा उचलला आहे. समाजातील गरजूंना या फायदा व्हावा तसेच अन्य दानशूर व्यक्ती आणि संस्था मदत करण्यासाठी पुढे याव्यात हा यामागचा प्रमुख हेतू आहे. असे राजेश सुर्वे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद यांनी सांगितले.