रायगड - सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच रहा सुरक्षित राह, असे वारंवार ओरडून सांगत आहेत. मात्र, काही उनाडटप्पू, बिनकामाचे नागरिक आजही आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन सर्रास बाहेर पडतात. अशा चालकांवर आणि वाहनधारकांवर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली असून सुमारे 51 लाख 15 हजार 100 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. पोलीस वाहने जप्त करून दंडही घेत असल्याने आता रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासन सर्वोपत्तरी प्रयत्न करत आहे. पोलिसही दिवसरात्र तैनात असून नागरिकांना बाहेर पडू नका असे आवाहन केले जात आहे. जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी भागात ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार केली आहेत. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त विनाकारण खासगी वाहने रस्त्यावर फिरवणाऱ्या मुजोर वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामध्ये चालकाची वाहनेही जप्त केली जात आहेत.
जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणाऱ्या चालकांवर कारवाई करत 3031 वाहने जप्त केली आहेत. तर, 17 हजार 795 वाहन चालकांवर कारवाई केली असून जवळपास 51 लाख 15 हजार 100 रुपये इतकी दंड आकारणी केली आहे. जिल्हा पोलिसांनी 22 मार्च ते 14 एप्रिल या लॉकडाऊन काळात ही कारवाई केली आहे. तर, 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढले असल्याने हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना युद्धात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून त्यांनी घरात राहूनच या शत्रूला हरविण्यासाठी शासनाला मदत करणे गरजेचे आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला असल्याने काही प्रमाणात वाहनांची संख्या कमी झाली आहे. मात्र, तरीही अति महाभाग हे वाकड्या रस्त्याने वाहने घेऊन येत असल्याने अशा वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.