रायगड- गणरायाच्या आगमनाला दोन दिवस उरले आहेत. गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी चाकरमान्यांनी आपल्या गावी येण्याची सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गवर गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर रायगड हद्दीत १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. २५ पोलीस अधिकाऱ्यांसह २१७ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तसेच रुग्णवाहिका, क्रेन, मदतकेंद्र आणि वायरलेस यंत्रणाही रायगड पोलिसांकडून ठिकठिकाणी ठेवण्यात आली आहे. गावी येणाऱ्या चाकरमान्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.
गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांचा महत्वाचा सण असतो. मुंबई, उपनगर, ठाणे, कल्याण, डोबिवली शहरात राहणारा चाकरमानी हा आवर्जुन गणेशोत्सव सणाला गावी जात असतो. मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी हा गावी जाण्यास निघाला की महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते. त्यामुळे, प्रवाशांना चार, पाच तास वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यास लागत असतात. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड पोलिसांनी आपल्या हद्दीतील १४५ किलोमीटर महामार्गात २१७ पोलीस कर्मचारी आणि २५ अधिकारी ठिकठिकाणी तैनात केले आहेत. तसेच, वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी १६ ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रहदारीची महत्वाची ठिकाणे असलेल्या खारपाडा, हमरापूर, पेण, वडखळ, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर, कशेडी घाट या महत्वाच्या ठिकाणी पोलीस चौक्यांसह, रुग्णवाहिका आणी क्रेनचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईसह इतर ठिकाणांहून प्रवास करणाऱ्या गणोश भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी, तसेच महत्वाच्या बाजारपेठांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत पेण-खोपोली बायपास ४, रामवाडी चौकी ३, वडखळ ३, इंदापूर स्थानक १, महाड शहरातील नातेखिंड मदत केंद्रात ३, विसावा हॉटेल परिसरात १ तर पाली येथे २, असे एकूण १६ ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात एकूण २८७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे
जिल्ह्यात एकूण २८७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर, १ लाख २३९ खाजगी गणपती आहेत आणि १३ हजार ३७२ ठिकाणी गौरी स्थापना होते. गणशोत्सव काळासाठी जिल्ह्यातील पोलीसबळाव्यतिरिक्त काही ठिकाणी होमगार्ड व राज्य राखीव दलाची मदत घेतली जाणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सव सणावर कोरोना संकट आहे. आणि चाकरमानी हा आधीच गावी पोहोचला आहे. त्यामुळे, महामार्गावर दरवर्षीप्रमाणे वाहतूक कोंडी समस्या जाणवणार नाही. तसेच, पेण-वडखळ दरम्यान पूल झाल्याने वडखळ येथील वाहतूक कोंडी समस्या सुटली आहे. मात्र, असे असले तरी रायगड पोलिसांनी गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने मुंबई-गोवा महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.
बंदोबस्तावर असलेली पोलीस संख्या व साधणे:
सी.सी. टीव्ही- १६
पोलीस उपविभागीय अधिकारी- ६
पोलीस निरीक्षक- ६
सहाय्यक पोलीस निरीक्षक/ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक- १३
वाहतूक पोलीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी- २१७+
मदत केंद्र- ९
वॉकीटॉकी -२०
क्रेन- ९
रुग्णवाहिका- ९
हेही वाचा- जिल्हा पोलीस दलातील 127 जणांना कोरोनाची लागण; पोलीस अधिक्षकांची माहिती