रायगड - जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांची अखेर शासनाने सहाय्यक संचालक आरोग्य सेवा या रिक्त पदावर अकोला येथे बदली केली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाला आता चांगला वैद्यकीय अधिकारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ. अजित गवळी यांना एनआरएचएम घोटाळा भोवल्याने त्यांची बदली झाली असल्याची चर्चा रंगली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याकडे सध्या प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या गैरव्यवहाराबाबत विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी आरोग्य मंत्री यांनी एनआरएचएम अंतर्गत विविध कामात आणि खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट करून त्यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करून गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार डॉ. अजित गवळी यांची चौकशी सुरू करण्यात आली होती.
शासनाने 7 फेब्रुवारीला परिपत्रक काढून डॉ. अजित गवळी यांची अकोला येथे सहाय्यक संचालक या रिक्त पदावर बदली केली आहे. डॉ. अजित गवळी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अकार्यक्षम पद्धतीने काम केले होते, असा आरोपही त्यांच्यावर होता. त्यामुळे त्याचा त्रास हा सर्वसामान्य रुग्णांनाही सहन करावा लागला होता. डॉ. अजित गवळी यांच्या बदलीनंतर आता चांगला वैद्यकीय अधिकारी जिल्ह्याला मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.