रायगड - प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक पावलावर आपल्याला गुरुंची शिकवण मिळत असते. माझे पहिले गुरू हे आई वडील असून त्यांनी मला जीवनात संघर्ष करण्याची, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा दिली. जिल्हाधिकारी होणार हे शालेय जीवनात शिक्षकांनी ओळखले होते. मला तहसीलदार म्हणजे काय? हे माहित नसताना ते मला 'कलेक्टर सायबा' म्हणायचे. त्यामुळेच राजस्थानमधील एका लहानश्या खेड्यातील मुलगी जिल्हाधिकारी होऊ शकली, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
माझे पहिले गुरू माझे आई-वडील आहेत. त्यांनी माझ्यावर संस्कार केले. मला घडवले. त्यांनी मला संघर्ष करायला शिकवले. मी राजस्थानमधील एका छोट्याशा खेड्यामधून आहे. सरकारी शाळेतील शिक्षकांनी स्वप्रेरणेने मला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहीत करत होते. मला साधा तहसीलदार काय असते, हे माहिती नव्हते. त्यावेळी माझे शिक्षक मला 'कलेक्टर सायबा' म्हणायचे. त्यांनी ते आधीच ओळखले होते. त्यामुळे मी जिल्हाधिकारी बनायचे ठरवले. माझे आई-वडील आणि माझ्या शिक्षकांमुळेच हे शक्य झाले, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना माझे वरिष्ठ अधिकारीही गुरूच्या भावनेने सल्ला देत असतात. त्यामुळे प्रत्येक क्षणाला त्यांच्याकडून शिकण्याची प्रेरणा मिळत असते, असे जिल्हाधिकारी चौधरी म्हणाल्या. तसेच त्यांच्या जीवनात शिकण्याची प्रेरणा देऊन आपल्या पायावर उभे करण्यास सहकार्य दिले, त्या सर्व गुरुंना त्यांनी वंदन केले. तसेच त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.