रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी अटक केल्यानंतर अर्णब गोस्वामींसह दोन जणांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर कोणताही निकाल न देता 23 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. तर अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढून घेतला आहे. फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनी जिल्हा सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढलेला नाही.
अर्णब गोस्वामी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेला जामीन अर्ज आज त्याच्या वकिलांनी मागे घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळेपर्यंत फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना सर्वोच्च न्यायालयातून अतंरिम जामीन मिळाला आहे. मात्र, या केस मधुन कायम स्वरुपाचा आपला जामीन अर्ज अद्याप त्यांनी मागे घेतलेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर होणार निर्णय-
रायगड पोलिसांच्या पुनर्विचार याचिकेबाबत उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे पुनर्विचार याचिकेवर निकाल देण्याबाबत सरकारी वकिलांनी मागणी जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आल्यानंतर 23 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ असे विशेष सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.