मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गुरूवारी सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी जमणारी गर्दी लक्षात घेता दादर परिसरातील वाहतुकीमध्ये फार मोठे बदल करण्यात आले आहेत. परिसरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी परिसरातील 15 मार्गांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस चढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी 6 वाजता मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पंतप्रधानांच्या सभेसाठी पश्चिम आणि पूर्व महामार्गावरून अनेक वाहने शिवाजी पार्क मैदानात सभेच्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. या सभेमुळे मुंबईकरांना तसेच या परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
आज (14) नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दादर आणि आसपासच्या परिसरातील 15 मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. याकारणानं वाहनचालकांना पर्यायी मार्गसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीसाठी पर्यायी मार्गासोबत शिवाजी पार्क मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टींवरही लक्ष दिले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देण्यासाठी आमचे समर्पित कार्यकर्ते अगदी मनापासून काम करत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांचे हे अथक परिश्रमाच्या दरम्यान 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता 'माझा बूथ सर्वात मजबूत' या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी प्रचंड…
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2024
शिवाजी पार्क परिसरात वाहने उभी करण्यासाठी प्रतिबंध असलेले मार्ग
- स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, दादर शिवाजी पार्क
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) पासून हरिओम जंक्शनपर्यंत, केळूस्कर रोड दक्षिण तसेच केळुस्कर रोड उत्तर
- एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क, दादर
- पांडुरंग नाईक मार्ग (रोड क्रमांक ५) शिवाजी पार्क, दादर
- दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क, दादर
- लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग, शिवाजी पार्क गेट नंबर – ४ शीतलादेवी रोड, शिवाजी पार्क
- एल.जे. रोड : गडकरी जंक्शन, दादरहून शोभा हॉटेल, माहीमपर्यंत
- एनसी केळकर रोड : हनुमान मंदिर जंक्शन ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क, दादर
- टी.एच. कटारिया रोड, गंगा विहार जंक्शन पासून आसावरी जंक्शन, माहीम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माहेश्वरी सर्कल पासून कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)
- टिळक रोड : कोतवाल गार्डन सर्कल
- दादर (पश्चिम) ते आरए किडवाई रोड, माटुंगा (पूर्व)
- खान अब्दुल गफ्फार खान रोड, सी लिंक रोड पासून जे.के. कपूर चौक मार्गे पुढे बिंदू माधव ठाकरे चौक
- थडाणी रोड : पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक
- डॉ. ॲनी बेझंट रोड, पोद्दार हॉस्पिटल जंक्शन पासून डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन
- अनेक ठिकाणी रस्ते मार्ग बंद केल्यानं काही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एसव्हीएस रोड मार्गानं उत्तरेकडे जाणारे लोक हे सिद्धिविनायक जंक्शन ते एस. के. बोले रोड – आगर बाजार–पोर्तुगीज चर्च–गोखले, एस. के. बोले रोड असा पर्यायी मार्ग घेऊ शकतात.
पंतप्रधान मोदींकडून भाजपा कार्यकर्त्यांचं कौतुक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियावर मराठीत पोस्ट करत महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळवून देण्यासाठी आमचे समर्पित कार्यकर्ते अगदी मनापासून काम करत आहेत. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता 'माझा बूथ सर्वात मजबूत' या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे."
पंतप्रधान मोदी शरद पवारांचा आज उल्लेख करणार?लोकसभा निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात बोलताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना 'भटकती आत्मा' असे म्हटलं होते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या सभेनंतरही लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. दुसरीकडं बारामती लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवरील मोदींच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा फटका बसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका करण्यात आली नाही. पंतप्रधान मोदी आज शेवटच्या सभेत शरद पवारांवर यांचा उल्लेख करणार का? याकडं संपूर्ण राज्याच लक्ष लागलेलं आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती संभाजीनगरमध्येदेखील सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबरपासून राज्यात दौरे करण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनी यापूर्वी पुण्याच्या एस. पी. कॉलेजच्या मैदानावर 12 नोव्हेंबरला सभा घेतली.
हेही वाचा-