ठाणे : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या एका मागतेकरी महिलेवर तिच्या दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करण्याचा प्रसंग ओढावला. दरम्यान, या महिलेला आणि अन्य तिघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं कल्याण पश्चिमेतील रामदेव हाॅटेलजवळील सहजानंद चौक येथे सापळा रचत अटक केली आहे.
आरोपींची नावं : वैशाली किशोर सोनावणे (वय 35, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कोपररोड, डोंबिवली) या मध्यस्थ महिलेच्या माध्यमातून हा विक्री व्यवहार होत होता. दीपाली अनिल दुसिंग (वय 27, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी), बाळाची आई, किशोर रमेश सोनावणे (वय 34, रिक्षा चालक) अशी महात्मा फुले पोलीस ठाण्यात कोठडीत असलेल्या आरोपींची नावं आहेत.
सापळा रचत आरोपींना अटक : पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथील गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला डोंबिवली येथे राहणारी वैशाली आणि इतर मध्यस्थ हे एका स्त्री किंवा पुरूष जातीच्या लहान बाळाची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता विक्री व्यवहार करणार आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी एक विशेष पथक तयार करून विक्री व्यवहार करणाऱ्यांना सापळ्यात अडकविण्याची व्यूहरचना आखली.
गुन्हा दाखल : पोलिसांनी बाळ खरेदीसाठी एक बनावट ग्राहक तयार केला. या ग्राहकाच्या माध्यमातून पोलीस मध्यस्थ महिलेच्या संपर्कात गेले. मध्यस्थ महिलेनं आपल्याकडं स्त्री जातीचं 42 दिवसांचं बाळ असल्याचं ग्राहकाला सांगितलं. तसंच बाळ हवं असेल तर चार लाख रूपये द्यावे लागतील, असंही ती म्हणाली. विक्री व्यवहारातील बालक आम्ही कल्याण पश्चिमेतील रामदेव हाॅटेलजवळ सहजानंद चौक भागात घेऊन येणार आहोत. प्रथम तुम्ही बालिकेला पाहा. मग पैसे घेऊन या, असा निरोप मध्यस्थ महिलेनं बनावट ग्राहकाला दिला. मध्यस्थ महिला सहजानंद चौक येथे मंगळवारी येणार असल्याचं समजल्यावर पथकानं त्या भागात सापळा लावला. त्यानंतर महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेमधील मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्यानं चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तपासादरम्यान, या मागतेकरी महिलेला एक पाच वर्षाचा मुलगा, सात आणि नऊ वर्षाच्या दोन मुली असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं. त्यांच्या सुरक्षा आणि देखरेखीसाठी पाच वर्षाच्या मुलाला डोंबिवली एमआयडीसीतील जननी आशीष बालगृह, तर दोन्ही मुलींना अंबरनाथ येथील नीला बालसदन येथे ठेवण्यात आलंय. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे यांच्या पथकानं पार पाडली.
हेही वाचा -